पुण्यात गॅस साठ्याची धोकादायक बाब उघड – टिंगरेनगरला परवानगी असताना मुंढव्यात विनापरवाना ३०० हून अधिक सिलेंडरचा अवैध साठा!
पुणे – नुकतेच मुंबईच्या धारावी परिसरात झालेल्या मोठ्या गॅस अपघातानंतर राज्यभरात नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच पुण्यातही एक गंभीर आणि धोकादायक प्रकार समोर आला आहे. दुबरोस गॅस एजन्सीने अधिकृत परवाना टिंगरेनगर येथील गोडाऊनसाठी घेतलेला असतानाही, एजन्सीने मुंढवा भागात एका अनधिकृत ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा केल्याचे उघड झाले आहे.
मुंढवा येथील या ठिकाणी जवळपास ३०० हून अधिक घरगुती गॅस सिलेंडर साठवण्यात आले असून, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. या भागात जमिनीवर गॅस साठवण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नाही. याशिवाय, ही वस्ती रहिवासी भागाच्या अगदी जवळ असून, कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील गॅसचा साठा ठेवला जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी सरळसरळ खेळ खेळण्यासारखे आहे.
मुंढवा परिसरात जवळच मोठी शाळा, हॉस्पिटल्स, दुकानांची गर्दी आणि दाट वस्ती असल्याने, जर इथे कोणतीही आगीची किंवा स्फोटाची घटना घडली, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारावीतील अपघातात गॅस सिलेंडर फुटून भीषण आग लागली होती, ज्यात काही जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच पुण्यात अशी निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणे अत्यंत दुर्दैवी आहे.
गॅस सिलेंडरच्या साठवणुकीसाठी सरकारने ठराविक मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली आखून दिलेली आहे. भारतीय पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ (PNGRB) आणि जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणतेही ठिकाण गॅस साठवणीसाठी वापरणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात दुबरोस गॅस एजन्सीने या सर्व नियमांना हरताळ फासल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
सदर ठिकाणी ना कोणतीही फायर सेफ्टीची व्यवस्था आहे, ना सीसीटीव्ही यंत्रणा, ना इमर्जन्सी एग्झिट्स. यामुळे एखाद्या अपघाती घटनेवेळी त्वरित प्रतिसाद देणे अशक्यच आहे. स्थानिक नागरिकांनीही या गोष्टीकडे लक्ष वेधले असून, अनेकांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या एजन्सींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून इतर एजन्सींनाही धडा मिळेल.
पेट्रोलियम मंत्रालयाने आणि जिल्हा प्रशासनाने यावर लक्ष देऊन अशा अवैध साठ्याच्या ठिकाणांची तपासणी सुरू करावी आणि शहरभर गॅस साठवणीच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. अन्यथा, पुण्यातही धारावीसारखी दुर्घटना घडणे अवघड नाही.
सध्या तरी, या धोकादायक साठ्याची माहिती सार्वजनिक होणे ही जनतेसाठी जागरूकतेची घंटा आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या अनधिकृत आणि असुरक्षित साठ्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. प्रशासन, पोलिस, अग्निशमन विभाग आणि गॅस वितरक यंत्रणांनी एकत्र येऊन अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
हा प्रकार केवळ एका एजन्सीचा नाही, तर संपूर्ण यंत्रणेला प्रश्न विचारणारा आहे – आपल्या शहरात किती अशा ठिकाणी जीवघेणा साठा गुपचूपपणे सुरू आहे? याचा शोध घेणे आणि तत्काळ उपाययोजना करणे काळाची गरज आहे.
सीलेंडरमध्ये अनेक एजन्सी धारकांकडून गॅस कमी असल्याचे चित्र?
पुण्यात अनेक गॅस एजन्सीधारक अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात या बाबतीत फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. अनेक ठिकाणी ग्राहकांना पूर्ण गॅस मिळत नाही, सिलेंडरमध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. ग्राहकांनी वजन तपासण्याची मागणी केली तर वितरकाकडून ठरलेली उत्तरं मिळतात – "सिलेंडर लिकेज असेल" "वजन काटा नाही", "काटा बिघडलेला आहे", "काटा दुरुस्तीला दिला आहे". या प्रकारांमुळे ग्राहकांची स्पष्ट फसवणूक तर होतेच, पण त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. या गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा बेजबाबदार एजन्सींच्या हातात संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेचा धोका सोपवला जातो.
भाग 1
क्रमशः
लवकरच भाग 2 मध्ये आणखीन धक्कादायक माहिती आणणार समोर...
Post a Comment
0 Comments