Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुण्यातील कडनगर चौकात बेवारस वाहनांवर वाहतूक विभागाची आणि महापालिकेची संयुक्त धडाकेबाज कारवाई ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ; नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार...


पुण्यातील कडनगर चौकात बेवारस वाहनांवर वाहतूक विभागाची आणि पुणे महापालिकेची संयुक्ताने धडाकेबाज कारवाई ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ; नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार...

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागाने केलेल्या योजनाबद्ध कारवाईअंतर्गत, कडनगर चौक परिसरात बरेच दिवसांपासून रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांना सात दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. नोटीसीची मुदत संपल्यानंतर वाहतूक विभागाने महापालिकेच्या मदतीने ही वाहने रस्त्यावरून हटवली.

काळेपडळ वाहतूक विभाग अंतर्गत येणाऱ्या कडनगर चौक परिसरात काही वाहनधारकांनी आपली वाहने अनेक दिवसांपासून रस्त्यावर बेवारस स्थितीत उभी ठेवली होती. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता आणि परिसरातील नागरिकांचीही गैरसोय होत होती. अनेकदा स्थानिक रहिवाशांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले.

या कारवाईसंदर्भात माहिती देताना काळेपडळ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, “सार्वजनिक रस्त्यांवर अनेक दिवस बेवारस अवस्थेत असलेली वाहने ही केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी आश्रयस्थळ ठरू शकतात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.”

सदर कारवाई महापालिकेच्या सहाय्याने करण्यात आली असून, नोटीस लावल्यानंतर वाहनधारकांनी स्वतःहून वाहने न हलविल्यामुळे त्यांची वाहने उचलून वाहतूक विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या सोबत वाहतूक विभागातील पोलिस हवालदार आप्पाराव कोळी, संग्राम पाटील, राहुल लेकावळे आणि पोलिस शिपाई अतुल शिरसाट यांनी कार्यवाहीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. "अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे व्हाव्यात, जेणेकरून सार्वजनिक जागांचा अयोग्य वापर रोखता येईल आणि वाहतुकीला गती मिळेल," असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

पुढील काळात देखील अशा प्रकारच्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या वाहनांचा रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

Post a Comment

0 Comments