पुणे : शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग आणि विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. येरवडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनचोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून ३०,००० रुपये किमतीची अॅक्टीव्हा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी विशेष सूचनांच्या अनुषंगाने तपास मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाला आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.
दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस कर्मचारी तुषार खराडे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रामनगर परिसरातून चोरलेली पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा दुचाकी विक्रीसाठी येरवड्यातील मेंटल ग्राऊंड येथे आणली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अहवाल देऊन कारवाईचे आदेश घेण्यात आले.
तपास पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता, एका इसमास पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटारसायकल घेऊन थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तपास पथकाने त्याचा पाठलाग करत अतिशय शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने स्वतःचे नाव सुरज संतोष माने (वय २४, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडील वाहनाची अधिक चौकशी केली असता, येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२७/२०२५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत आरोपीकडून ३०,००० रुपये किमतीची अॅक्टीव्हा मोटारसायकल जप्त करण्यात आली. यामुळे वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर तसेच तपास पथक प्रमुख सपोनि सुनिल सोळुंके, प्रदीप सुर्वे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, चोरीस गेलेल्या वाहनांची तक्रार तातडीने नोंदवा आणि संशयास्पद व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती द्या, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल.
Post a Comment
0 Comments