पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): इर्टीगा कार भाड्याने घेऊन ती अनधिकृतरित्या विक्री करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत खराडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, सुमारे १ कोटी ६३ लाख रुपयांच्या १६ इर्टीगा कार जप्त केल्या आहेत.
तक्रारदार प्रथमेश दत्तात्रय नलवडे (वय २४, रा. चिलेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, "पॅलेस कार रेन्टल" नावाने सिटी व्हिस्टा बिल्डिंग, खराडी, पुणे येथे कार्यालय सुरू करून आरोपींनी गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. शिरीष सणस (एच. आर.), कुंदन यादव (मॅनेजर) व इतरांनी नलवडे यांची ११.८९ लाख रुपये किमतीची इर्टीगा गाडी (एम.एच.११ बी.की.७६६७) नोटरी करारनाम्याने भाडेतत्वावर घेतली. मात्र, त्यांनी ती गाडी परभणी येथील अशोक कुरढाने याला "डेमो कार" असल्याचे सांगून विकली आणि फसवणूक केली.
या प्रकरणाचा अधिक तपास करताना पोलिसांना असे आढळले की, आरोपींनी फेसबुकवर जाहिरात देऊन गाड्या भाड्याने देतो, तसेच डेमो कार कमी किमतीत मिळेल, असे आमिष दाखवून अनेकांना फसवले आहे. त्यांनी करारनाम्याद्वारे गाड्या घेतल्या आणि त्या नव्या किंवा डेमो कार असल्याचे भासवून कमी किमतीत विकल्या. अशाप्रकारे आरोपींनी अनेक कार मालकांची फसवणूक केली होती.
खराडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने अधिक चौकशी करत संशयित आरोपी कुंदन कैलास यादव (वय २३, रा. वरगाव बुद्रुक, पुणे) याला स्वीट इंडिया चौक, खराडी येथे अटक केली. त्याच्या चौकशीतून या टोळीच्या मास्टरमाइंड शिरीष सणस ऊर्फ संदीप ऊर्फ सौरभ सुनिल काकडे याचा सहभाग उघडकीस आला. शिरीष सणस सध्या येरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जीपीएस ॲपच्या मदतीने १६ इर्टीगा गाड्यांचे लोकेशन मिळवून त्या जप्त केल्या. या जप्त गाड्यांची एकूण किंमत १ कोटी ६३ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, संतोष म्हेत्रे, तसेच पोलीस अंमलदार नवनाथ वाळके, महेश नाणेकर, अमोल भिसे, सुरेंद्र साबळे, अमित जाधव, सचिन पाटील, प्रफुल मोरे, मुकेश पानपाटील, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, अक्षय गार्डे व प्रविण गव्हाणे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांनी आवाहन केले आहे की, जर कोणाची अशाप्रकारे फसवणूक झाली असेल, तर त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (मो.नं. ९६६५६०२६१०) यांच्याशी संपर्क साधावा.
Post a Comment
0 Comments