Pune : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून रणकंदन पाहायला मिळाले. पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी हडपसर-सासवड-जेजुरी रस्त्याच्या कामांवर होत असलेल्या अपघातांवरून आक्रमक पवित्रा घेतला.
अखेर पालकमंत्री अजित पवार यांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक विधानभवन पुणे येथे गुरुवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार व सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी शिवतारे यांनी बैठकीत मांडलेली आकडेवारी पाहून पालकमंत्री अजित पवार देखील अवाक झाले. बैठकीत शिवतारे म्हणाले, पालखी महामार्गावर दिवे घाटापासून निरापर्यंत मागील दीड वर्षात 137 अपघात झाले असून, यात 101 लोक मृत्युमुखी पडले. तर 133 लोक जबर जखमी झाले आहेत.
महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न करता प्रचंड निष्काळजीपणाने काम चालविले आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक व माहितीदर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनांचे जबर अपघात होत आहेत. गेल्या काही दिवसांत बेलसर फाटा, ढुमेवाडी, दिवे परिसरात मोठे अपघात होऊन जवळपास 7 ते 8 लोक दगावले आहेत.
बेलसर फाट्यावर मृत्युमुखी पडलेल्या तिघांची व्यथा शिवतारे यांनी या वेळी सभागृहात मांडली. ती ऐकताच पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम हे देखील शिवतारे यांच्या कचाट्यातून सुटले नाहीत. कदम हे बेजबाबदार अधिकारी असून, अशा पद्धतीने वागाल तर तुमच्याही कुटुंबाचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवतारे यांनी सुनावले. या वेळी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात सांगितले.
Post a Comment
0 Comments