Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Manoj Jarange : अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची मनोज जरांगेंची घोषणा, यापुढे उपोषण कायमचे बंद, कारणही सांगीतले

 

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण थांबवण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणी अडथळा आणला याचा खुलासा आता झाला असून, मराठा समाजाचे डोळे उघडल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

तसेच, यापुढे शक्यतो उपोषणाच्या माध्यमातून लढाई न लढण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील दिशा ठरवण्यासाठी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण थांबणार

मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत होते. मात्र, या कालावधीत त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला, तरी शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. "मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागेल, असे वाटले नव्हते," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लक्ष राहावे म्हणून निर्णय

मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना, जरांगेंचे उपोषणही सुरू होते. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष हटू नये, म्हणून आपण उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांवर टीका, सरकारला इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, "खरे असेल ते टिकत नाही आणि जे हक्काचे आहे तेच दिले जात नाही. फडणवीस मराठा आरक्षणाबाबत 'होय' किंवा 'नाही' असे स्पष्ट उत्तर देत नाहीत. त्यांची मराठा समाजाबद्दलची मनोवृत्ती आता उघड झाली आहे."

तसेच, “आमच्याशी बेइमानी केल्यास पुढची पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घ्यावी, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments