मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागच्या १५ तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही फोन बंद असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं तेव्हा पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटात आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या जवळपास सर्वच आमदारांना शिंदे गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र केवळ श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली. काल त्यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी दिल्याचं स्पष्ट होताच श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला होता. तसेच ढशाढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. तू मतदारसंघात निवडून येत नाही, तुझ्याबाबतीत नकारात्मक अहवाल आलाय हे कारण देऊन मला मागेही थांबवले, मी प्रामाणिकपणे थांबलो. प्रत्येक वेळी गावितांना तिकिट दिले. जेव्हा जेव्हा चांगली संधी येते, मी चांगले काम केले तरीही मला डावलण्यात आलं असं सांगत आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले होते.
दरम्यान, श्रीनिवास वनगा हे नाराज झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांसोबत संवाद साधून श्रीनिवास वनगा यांना योग्य तो मान दिला जाईल, असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
Post a Comment
0 Comments