पुणे : काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी महाविकास आघाडीची निवडणूक पूर्व संयुक्त बैठक पार पडली. यात शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले नसल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, तसेच दोन्ही पक्षांचे शहरातील इच्छुक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते व संघटनात्मक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना शहराध्यक्ष, जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलावली आहे, त्यामुळे शहरातील संजय मोरे व गजानन थरकुडे हे त्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय शिवसेनेचे अन्य कोणी पदाधिकारीही बैठकीला हजर नव्हते. त्याची चर्चा सुरू झाल्यावर अन्य पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती बैठकीतील उपस्थितांना देण्यात आली.
राज्य सरकारच्या विरोधात जनमत आहे. ते मतदानामध्ये परावर्तित करायचे असेल, तर महाविकास आघाडी एकसंघपणे काम करताना दिसायला हवी. मतभेद, एकमेकांबद्दलचा राग विसरायला हवा. तसे झाले, तर यश मिळेल, असे मत बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. उमेदवार तुमचा-आमचा असे केले तर तोटा होईल. ज्या मतदारसंघात काम करता तिथेच राहून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काम करायचे, शेजारच्या मतदारसंघात आमच्या पक्षाचा उमेदवार आहे, तिथे जाऊन काम केले तर त्याचा परिणाम मतांवर होतो. त्यामुळे असे करणे टाळावे, असा सल्लाही या नेत्यांनी दिला.
कोथरूड शिवसेनेला, तर हडपसर राष्ट्रवादीला ?
शिवसेनेने हडपसर व कोथरूड या दाेन जागांचा आग्रह महाविकास आघाडीत धरला आहे. यातील हडपसरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आग्रही आहे, तर कोथरूडची जागा काँग्रेसला हवी आहे. यामध्ये कोथरूडची जागा शिवसेनेला देऊन हडपसरची जागा राष्ट्रवादीला ठेवावी, अशी तडजोड करण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली.
Post a Comment
0 Comments