राज्यातील शालेय शिक्षण विभागात वशिलेबाजीचा कहर ; निष्क्रीय अधिकाऱ्यांना मिळताहेत महत्त्वाच्या पदांचे अतिरिक्त कार्यभार...
पुणे : राज्य शालेय शिक्षण विभागात सध्या वशिलेबाजी आणि अनियमिततेची मोठी चर्चा रंगली आहे. विविध कार्यालयातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार देताना वशिलेबाजीच्या जोरावर निष्क्रीय आणि चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक सक्षम आणि पात्र अधिकारी नाराज असून, शिक्षण व्यवस्थेत अस्वस्थता पसरली आहे.
राज्यातील नऊ प्रमुख कार्यालयांतील शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त असून, या पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये वशिलेबाजीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषत: चौकशीच्या कचाट्यात असलेले डॉ. वंदना वाहुळ (पुणे), ज्योती शिंदे (मुंबई बोर्ड), आणि रजनी रावडे (शिक्षण आयुक्तालय) यांच्यासारखे अधिकारी महत्त्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
वशिलेबाजीचा शिरकाव :-
सेंट्रल बिल्डिंगमधील एका संचालक कार्यालयात या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवून, फक्त सोयीसाठी वशिलेबाजीच्या जोरावर कार्यभार देण्यात येत आहे. या अनियमिततेमुळे काही अधिकाऱ्यांनी न्यायासाठी मॅटकडे धाव घेण्याची तयारी केली असून, काहींनी पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे मानसिक तणावातून स्वेच्छानिवृत्तीचा विचार सुरू केला आहे.
पदोन्नती नाकारण्याचे वाढते प्रमाण :-
शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती नाकारली असून, शिवलिंग पटवे (अमरावती) यांनीही नागपूर बोर्डाच्या अध्यक्षपदी पदोन्नती स्वीकारलेली नाही. यामुळे शिक्षण विभागात वशिलेबाजीची चळवळ आणि पदोन्नती प्रक्रियेतून होणारी अनियमितता उघड होत आहे.
अधिकार्यांचा संताप :-
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या वशिलेबाजीचा फायदा मिळाल्याने, शिक्षण व्यवस्थेत कार्यरत दिग्गज अधिकारी आपापल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी करत आहेत. या वशिलेबाजीमुळे शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, विभागातील असंतोष उफाळून आला आहे.
शिक्षण विभागाच्या व्यवस्थेमध्ये एक स्फोटक स्थिती निर्माण झाली असून, योग्य ती पावले उचलली नाहीत तर पुढील काळात अनेक अधिकारी न्यायासाठी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Post a Comment
0 Comments