आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल ; भाजपने पकडला फराळाचे वाटप करणारा टेम्पो...
काय म्हणाले यावर धंगेकर ?
पुणे : आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपानंतर, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढत आहेत. रविवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाच्या पाकिटांची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला, ज्यावर आमदार धंगेकर यांची छायाचित्रे असलेल्या पाकिटांचा समावेश होता. भाजपने आरोप केला आहे की, धंगेकर आणि हिंदमाता प्रतिष्ठानच्या नावाखाली सणाच्या फराळाचे वाटप करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात धंगेकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 171H, BNS कायदा 173 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950, 1951 आणि 1989 च्या कलम 123(1)(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचा आरोप :
पुणे भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले की, "धंगेकर हे निवडणुकीत पराभवाच्या भीतीने आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. दिवाळीच्या भेटवस्तू वाटून ते मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे."
यावर प्रकरणावर काय म्हणाले धंगेकर :
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, "गेल्या 30 वर्षांपासून मी सामाजिक जीवनात कार्यरत आहे, आणि माझे कार्यकर्ते वर्षभर लोकांच्या सेवेत असतात. दिवाळीनिमित्त काही जीवनावश्यक वस्तू वाटल्या जात होत्या, मात्र यात माझा किंवा कुटुंबाचा कोणताही सहभाग नव्हता." तसेच, त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटले की, "भाजपने हे प्रकरण जाणूनबुजून ताणले आहे, आणि पोलिसांनी त्यांच्या दबावाखाली कारवाई केली. दरम्यान, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होत असले तरी मी थांबणार नाही मी लढत राहीन आणि मी जिंकेन."
ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चेत असून, धंगेकर यांच्यावरच्या आरोपांमुळे त्यांची राजकीय प्रतिमा कसोटीवर आहे.
Post a Comment
0 Comments