मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार...
पुणे : महापालिकेतून थेट संसदेत पाेहाेचलेल्या मुरलीधर माेहाेळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहकार आणि नागरी उड्डान खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. आज (११ जून) मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला.
पदभार स्विकारण्याअगोदर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला आणखी धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली माेहाेळ यांना सहकार राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मोहोळ यांचे नेतृत्व उदयास आणले आहे.
याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे काम करणारे खाते म्हणजे सहकार खाते आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला त्या खात्याची माहिती आहे. मला देशातील शेतकऱ्यांसाठी काम करायची संधी आहे. नवी मुंबईमधील विमानतळ, पुणे विमानतळ यासाठी मला काम करता येईल.
नवीन विमानतळ टर्मिनल मार्गी लागणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मुरलीधर माेहाेळ यांना नागरी उड्डयन व सहकार खाते देण्यात आले. त्यामुळे पुण्यातील विमानतळ तसेच सहकार खात्याशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप येथून वाहतूक सुरू झालेली नाही. यातील अडचणींवर लक्ष घालून नवीन टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मेट्रो प्रकल्पात लक्ष घालावे, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
0 Comments