नशेसाठी ज्येष्ठाचा खून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक...
पुणे : नशेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून खून केल्याची घटना ओतूर येथील कांदा मार्केटमध्ये शनिवारी (दि.८) घडली होती. ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नवाब अहमद शेख (वय ७२, सध्या रा. ओतूर ता. जुन्नर)असे खून झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. विलास बाबा वाघ (वय २०), प्रकाश बाबा वाघ (वय १९), भीमा गणेश हिलम (वय २५, तिघे रा. कन्या शाळेजवळ, ओतूर ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शेख यांचा मुलगा शादाब नवाब शेख (वय ४२, रा. निमोण तास, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नबाब शेख ओतूरमधील कांदा बाजारात मजुरी करायचे. शनिवारी शेख ओतूर कांदा बाजारात मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तेव्हा त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने व ओतूर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तपास सुरू केला. ओतूर बाजार आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. शेख यांचा खून होण्यापूर्वी बाजार आवारात सातजण संशयास्पद फिरत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पोलिसांनी तपास करून आरोपी वाघ, हिलम यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. नशा करण्यासाठी त्यांनी शेख यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून चोरी केलेले दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यात आयपीसी ३९६, १२०(ब) कलम वाढवण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments