काँग्रेस पक्षात विलीन होणार की नाही, हे 'या' एका गोष्टीवर अवलंबून; पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य...
पुणे : नजीकच्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. शरद पवार जे काही बोलत आहेत, ते राजकीय समीकरण अस्तित्त्वात येणार की नाही, हे सर्व ४ जूनच्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
शरद पवार यांच्या ज्या वक्तव्याची चर्चा आहे, ती मुलाखत साताऱ्यात ४ मे रोजी झाली होती. त्यावेळी मी त्याठिकाणी होतो. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसला सहकार्य करु शकतात किंवा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. पण मला वाटतं की, हे सगळं ४ जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत जर इंडिया आघाडीचे सरकार आले आणि विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच सत्तेत सामील होण्यासाठी अनेक छोटे पक्ष काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करतील किंवा विलीन होतील. शरद पवार यांच्या या आकलनात तथ्य असले तरी या सर्व गोष्टी निकालावर अवलंबून आहेत. ४ जूनला कोणाचं सरकार येणार, यावर या गोष्टी ठरतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments