Type Here to Get Search Results !

Add

Add

निलेश लंके समर्थकांना पोलिसांकडून दिला जातोय त्रास...

निलेश लंके समर्थकांना पोलिसांकडून दिला जातोय त्रास...

नगर : दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांना आता पोलिसांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दबावातून हे सर्व घडवून आणले जात असल्याची चर्चा आहे.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर कारवाईसाठी अतिरेक्यांना पकडण्यासाठी पाठवतात तसा मोठा फौजफाटा पाठवण्यात आला. या घटनेतून गावात पोलिसांमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मंगळवारी करण्यात आल्याची चर्चा होत आहे.

याबाबत सरपंच शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आपणास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात जामिनात गावात प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र मी गावचा सरपंच असल्याने ग्रामपंचायतच्या सर्व बैठका, पाणीपुरवठा विभागाच्या बैठकांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास मुभा देण्यात आलेली आहे. या आदेशाची प्रत आपण नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली असतानाही मंगळवारी सकाळी आपण ग्रामपंचायतीत बैठकीसाठी गेल्यावर नगर तालुका पोलिसांनी मोठा फौजफाटा गावात आणला. स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून आपल्याला बाहेर आणले. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्या समोर लगेच गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला यायचे आहे, असे धमकावले. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता पोलिसांच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसून आली, असे त्यांनी सांगितले.

सरपंच शरद पवार यांनी सांगितले की, निलेश लंके यांच्या समर्थकांना याप्रकारे खोट्या बोगस कारवाईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या हेतूने गुंतवण्याचे काम सुरू आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. नगर तालुक्यात अनेक ठिकाणचे बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या याकडे जाणीवपूर्वक पोलीस दुर्लक्ष करून राजकीय दबावातून आमच्या सारख्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत आता आम्ही स्वस्त बसणार नाही. पोलिसांची ही दबंगगिरी थांबली नाही तर पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक बाळासाहेब शेखर यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर न्यायालयात या पोलिसांविरुद्ध दाद मागणार असल्याचे सरपंच शरद पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments