मतदारसंघाचा आढावा पुणे काँग्रेस की भाजप दोघांमध्ये कोण...
पुणे : उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. वंचित बहुजन आघाडीने माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होत आहे.
वंचित' आणि 'एमआयएम' किती मते घेणार, यावर मोहोळ यांचा भिस्त असून, धंगेकर यांनी ही मते मिळविल्यास मोहोळ यांचा मार्ग खडतर होईल. त्यामुळे धंगेकरांचा 'कसबा पॅटर्न' लोकसभेमध्ये चालणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे ते पुणेकरांना चांगलेच परिचित आहेत. त्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानतंर ही निवडणूक एकतर्फी होणार, असे चित्र निर्माण झाले होते. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू होती. इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रमुख दावेदार होते. मात्र, काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने प्रारंभी इच्छुकांमधील नाराजी उफाळून आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यात धंगेकर यांना यश आले आहे. त्यामुळे मोहोळ यांच्यासाठी ही लढत सोपी वाटत असतानाच आता चुरशीचे वातावरण झाले आहे.
'वंचित', 'एमआयएम' किती मते घेणार?
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मनसेला रामराम केल्यानंतर त्यांच्यावर उमेदवारी मिळविण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यामध्येही यश आले नाही. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वंचितने त्यांना उमेदवारी दिली. गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना ६५ हजार मते मिळाली होती. मात्र, त्यावेळी वंचित आणि 'एम्आयएम' हे एकत्र होते. आता 'एमआयएम्'ने सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. मोरे आणि सुंडके यांनी जास्त मते घेतल्यास मोहोळ यांचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, ही मते मिळविण्यात धंगेकर यशस्वी झाल्यास मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
कसब्या'ची पुनरावृत्ती होणार का?
काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर झाल्यानंतर धंगेकर यांनी प्रचारात वेग घेतला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत वापरलेला 'कसबा पॅटर्न' या निवडणुकीतही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या राजकीय खेळीला उत्तर देण्याची वेळ मोहोळ यांच्यावर आली. पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ माजी नगरसेवकांना फोडण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे भाजपला धावाधाव करावी लागली आहे. सर्व मतदारांशी संपर्क साधत त्यांना आपलेसे करण्यास सुरुवात केल्याने मोहोळ यांना आता पळापळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कसब्याची पुनरावृत्ती हाणार का, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.
आतापर्यंत तीन नगरसेवक संसदेत
पुणे लोकसभा मतदारसंघ हा प्रारंभी काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्या हाती पुण्याची सूत्रे आली. १९९८ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे विठ्ठल तुपे आणि १९९९ मध्ये भाजपचे प्रदीप रावत हे खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, पुण्यावर कलमाडी यांचेच राज्य होते. २०१४ पर्यंत कलमाडी यांच्या इशाऱ्यावर पुण्याचे राजकारण चालत होते. २०१४ मध्ये अनिल शिरोळे यांनी कलमाडी यांचा पराभव केल्यानंतर तेव्हापासून पुण्यावर भाजपचे वर्चस्व आहे. २०१९ मध्ये गिरीश बापट हे निवडून आले. बापट यांच्या निधनामुळे भाजपने मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला आहे. पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी अण्णा जोशी. गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे तीन भाजपचे नगरसेवक खासदार झाले आहेत.
Post a Comment
0 Comments