Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अटक बालकाची तीन लाखांत विक्री...

सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला अटक बालकाची तीन लाखांत विक्री...

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी बालकाची तीन लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंडी (वय २४, रा. जंबगी, जि. विजापूर, कर्नाटक) आणि सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी बालकाला सुभाष कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) याला विकल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दांपत्य यवतमाळ येथून पुण्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. रात्री ते पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी पहाटे दोनच्या सुमारास आईजवळ झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाला उचलून नेले. याबाबत तेलंग यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्हीमधील चित्रीकरण तपासले. 

त्यात संशयित आरोपी कोणत्या मार्गाने गेले हे दिसून येत नव्हते. आरोपी मोटारीतून गेले असावे, असा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासात आरोपी कर्नाटक राज्यातील विजापूरला गेल्याचे निष्पन्न झाले.

Post a Comment

0 Comments