पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून पुण्यातील घटना...
पुणे : पत्नीवर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी पती घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी साडेसातच्या आधी जनवाडी जनता वसाहत येथील लाडाचा गणपती मंदिराजवळ घडला.
रेश्मा चंदर पंतेकर (३०, रा. जनवाडी जनता वसाहत) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर चंदर अशोक पंतेकर (३३) याच्यावर खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेश्मा यांचा भाऊ राहुल राजू मंजाळकर (२४, रा. सुतारवाडी बस डेपो जवळ, पाषाण) यांनी गुरुवारी (दि. २५) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोस्टमार्टम अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांची बहीण रेश्मा पंतेकर हिचा पती चंदर याने तिच्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून त्याची दुचाकी घेऊन पळून गेला. याबाबत माहिती मिळताच राहुल याने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत चंदर विरोधात तक्रार दिली. दरम्यान, मयत रेश्मा हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
अहवालातून रेश्मा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती चंदर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करत आहेत.
Post a Comment
0 Comments