पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी दोन भावांवर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिर रस्त्यावरील शांती मंदिराच्या भिंतीजवळ मंगळवारी (दि.१२) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
याबाबत तुषार सुरेश जाधव (वय-26 रा. दत्तनगर पोलीस चौकी मागे, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत रेणुसे, ओंकार पवार, प्रथमेश येणपुरे आणि इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी ३०७, ३२३, ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट आर्म अॅक्ट नुसार गुन्हा (FIR) दाखल केला असून संकेत रेणुसे याला अटक केली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार जाधव यांना फटक्यांची ऑर्डर मिळाली होती.
त्यामुळे फिर्यादी हे त्यांचा भाऊ मयुर जाधव याला सोबत घेऊन फटाके देण्यासाठी जैन मंदिर येथून चालले होते.
त्यावेळी आरोपी संकेत रेणुसे याने फिर्यादी यांचा भाऊ निखील जाधव याच्यासोबत 2019 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तर संकेत रेणुसे याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेला भाऊ मयुर याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तुषार आणि मयुर जाधव जखमी झाले आहेत.
Post a Comment
0 Comments