पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यापैकी एका अपघातात खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात दुचाकींची समाेरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
नगर रस्त्यावरील केसनंद फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला पादचारी कचरा वेचक आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, भंगार माल वेचण्याचे काम तो करायचा. खासगी बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी खासगी बसचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा लक्ष्मण वाघमारे (३१ ,रा. आव्हाळवाडी, मूळ रा. नांदेड) असे गुन्हा दाखल केलेल्या बसचालकाचे नाव आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री वाघोली ते राहू रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सचिन राजेंद्र जगताप (३०, रा. देवकरवाडी, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर कृष्णा जाधव (४२, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments