आता प्रतीक्षा संपली, नवी मुंबई मेट्रो आता ट्रॅकवर; गुलाबाचे फूल देऊन प्रवाशांचे स्वागत...
पनवेल : दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रतीक्षा असलेली नवी मुंबईमेट्रो अखेर शुक्रवारी कोणत्याही सोपस्कारांविना बेलापूर ते पेंधरदरम्यान धावली. ११ स्थानकांच्या या प्रवासात मेट्रोच्या वतीने गुलाबाचे फूल देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले.
पहिल्याच दिवशी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी मेट्रोचा पहिली सफर अनुभवली. मेट्रोचे नागरिकांनी स्वागत केले. विशेष म्हणजे पहिला मेट्रो प्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मेट्रोच्या चार टप्प्यांपैकी पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर हा ११.१० कि.मी. लांबीचा हा मार्ग आहे. एकूण ११ स्थानकांचा हा मार्ग आहे.
मेट्रो सेवा शुभारंभादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटच्यावतीने ॲड. प्रथमेश सोमण, रामदास शेवाळे आदींनी मेट्रोत शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे पोस्टर मेट्रोत झळकविले. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे गटाचे बबनदादा पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, राष्ट्रवादीचे फारूक पटेल यांनी मेट्रोत प्रवास केला.
महिला मोटरमनला मिळाला पहिला मान
दुपारी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखविताच पंचवीस वर्षीय महिला मोटरमन आदिती पड्यार यांनी हॉर्न वाजवून नवी मुंबईच्या मेट्रोच्या पहिल्या फेरीचे सारथ्य केले अन् उपस्थितांनी एकच जल्लोष केला. नवी मुंबईच्या तीन महिला मेट्रो चालकांपैकी त्या एक आहेत. याप्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आणि राजेश पाटील यांच्यासह मेट्राेचे संचालक हरीश गुप्ता उपस्थित होते. सध्या नवी मुंबई मेट्रोकडे तीन डब्यांच्या चार गाड्या आहेत.
राजकारण्यांची गर्दी
मेट्रो सेवा सुरू करताना शासनाने कोणताही राजकीय सोहळा केला नाही. अत्यंत साधेपणाने सुरू केलेल्या या सेवेदरम्यान राजकारण्यांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर झळकावून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. या प्रारंभादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केले.
आजपासून सकाळी सहा वाजता पहिली फेरी
शुक्रवारी दुपारी तीन वाजता मेट्रो प्रवासी सेवेला सुरुवात झाली. रात्री १० वाजता मेट्रोची शेवटची फेरी असणार आहे. दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधरदरम्यान सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो धावणार आहे.
मेट्रो स्थानकांत या आहेत सुविधा
मेट्रोसाठीचे डबे हे थेट चीनमधून नवी मुंबईत दाखल झालेले आहेत. अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे असून, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूंनी आगमन आणि निर्गमनाची व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, फूटपाथ, ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीजपुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
Post a Comment
0 Comments