NDA चा १४५ वा दीक्षांत समारोह आनंदात संपन्न ; संचलनातील महिलांचे राष्ट्रपतीं द्रौपती मुर्मू यांनी केले कौतुक...
पुणे : एनडीएचा खडतर कोर्स पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना पाहून मला आनंद होत आहे. कॅडेट्सच्या पालकांचे मी अभिनंदन करते. त्यांनी देशसेवेसाठी आपल्या मुलांना सर्व सहकार्य केले. एनडीएत २०२२ पासून महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली असून प्रथमच यंदाच्या संचलनात महिला सहभागी झाल्या ही उल्लेखनीय बाब आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.
द्रौपती मुर्मू यांच्या उपस्थितीत यंदाचा संचलन सोहळा पार पडला. यावेळी तिरंगा ध्वज फडकवत तीन चेतक हेलिकॉप्टर मधून संचलनाला सलामी देण्यात आली. खडकवासला येथील एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर संचलनासाठी करण्यात आलेली जय्यत तयारी, सोबतीला लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढायेजा...सारे जहाँ से अच्छा... विजय भारत...एनडीए गान या गाण्यांच्या तालावर दिलेली सलामी अशा दिमाखदार वातावरणात हा सोहळा गुरूवारी (३० नोव्हेंबर) पार पडला.
पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) 'क्वाटर डेक'चा उघडलेला दरवाजा आणि या दरवाजातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोहळ्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तिन्ही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा कॅडेट प्रथम सिंह हा यावर्षीचा राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. कॅडेट जतिन कुमार हा राष्ट्रपती रौप्य पदक तर कॅडेट हर्षवर्धन भोसले हा राष्ट्रपती कांस्य पदकाचा मानकरी ठरला. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले. तर, चीफ ऑफ स्टाफ बॅनर सन्मान ज्युलियन स्क्वॉडन हेमंत कुमार यांनी स्वीकारला.
महिलांना आजही करिअरसाठी करावा लागतो संघर्ष...
पुढे बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी, महिलांना करिअर करण्यासाठी आज देखील संघर्ष करावा लागत आहे. महिला कॅडेट्सला प्रशिक्षणातील अनुभव पुढील करिअरमध्ये उपयोगी पडेल. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वस्व पणाला लावणारे अधिकारी या ठिकाणी तयार होतात. प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या मूल्यांचा जीवनात पुढे जाण्यास फायदा होईल. देशाची शांती, समृद्धी ,स्थैर्य यासाठी देशाच्या सीमेसह आंतरिक सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. कोणत्याही युद्धाचा सामना करण्यासाठी नवीन युद्धनीती, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
तीन चेतक हेलिकॉप्टरमधून संचलनास सलामी...
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस दाखल होऊन त्यांनी कॅडेट्सची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर शानदार घोड्यांच्या बग्गीमधून राष्ट्रपती मुर्मू यांचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले. कॅडेट्सची मानवंदना स्वीकारल्यावर त्यांनी लष्करी जीप मधून संचलन पाहणी करत शिस्तबद्ध कॅडेट्सची मानवंदना स्वीकारली. यानंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि दुसऱ्या वर्षातील कॅडेट्सनी दिमाखदार संचलन करत प्रशिक्षणामधील उत्तुंग कामगिरी दाखवली. यावेळी तिरंगा ध्वज फडकवत तीन चेतक हेलिकॉप्टरद्वारे संचलनास सलामी देण्यात आली. या कार्यक्रमावेळी सीडीएस अनिल चौहान, एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोच्छर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डोगरा, कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह वेगवेगळ्या फॅकल्टीच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments