पुणे : हॉटेल मॅनेजर आणि कामगारांवर धारदार हत्याराने वार करून परिसरात दहशत निर्माण करणारा कोंढवा येथील सराईत गुन्हेगार गणेश बबन लोंढेसह त्याच्या ६ साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.
याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून टोळी प्रमुख गणेश बबन लोंढे (२३, रा. साठे चौक, महंमदवाडी), विशाल माधव गोरे (२०, रा. तरवडे वस्ती), मयुर माणिक पुरकास्त (१८, रा. कृष्णानगर), ऋषिकेश विठ्ठल घाडगे (२०, रा. तरवडे वस्ती) आणि शुभम नंदू चव्हाण (१९, रा. मोहंमदवाडी) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. टोळी प्रमुख गणेश लोंढे याने गुन्हेगारांची टोळी तयार केली. या टोळीने मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न, चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, दरोड्याची तयारी, दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे करत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, गणेश तोरगल, पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख, पोलिस कर्मचारी जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण आणि प्रदीप बेडीस्कर यांनी केली.
Post a Comment
0 Comments