Type Here to Get Search Results !

पुण्यात ढगाळ वातावरण ; तर इंदापूर,बारामतीमध्ये मुसळदार पाऊस...

पुण्यात ढगाळ वातावरण ; तर इंदापूर,बारामतीमध्ये मुसळदार पाऊस...

पुणे : पावसाळ्यामध्ये पुणे जिल्ह्यात कमी पाऊस झाला. तो देखील पूर्व भागात कमी आणि पश्चिम भागात अधिक झाला. परंतु, आता मॉन्सूनोत्तर पावसाने मात्र इंदापूर, बारामती परिसरात बुधवारी मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.बारामतीमध्ये १७ तर इंदापूरमध्ये ३८.५ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. पुणे शहरात मात्र बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच आज (दि.३०) देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव पुणेरकांना येत आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. आज (दि.३०) नाशिक जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, वीज, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा बनला आहे. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून, उकाड्यात वाढ पहायला मिळत आहे.

आज (दि.३०) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा 'येलो अलर्ट' दिला आहे.पुणे शहरामध्ये पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथे २१ ते २२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज सकाळी नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments