Type Here to Get Search Results !

शेवटी ससूनला मिळाले ३८ हजार सलाइन ; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत...

शेवटी ससूनला मिळाले ३८ हजार सलाइन ; अपुऱ्या साठ्यामुळे रुग्ण होते चिंतेत...

पुणे: ससून रुग्णालयाला अखेर १०० मिलीच्या ३८ हजार सलाइनच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. ससून प्रशासनाने या बाटल्यांची स्थानिक पातळीवर खरेदी केली असून, हा साठा पुढील तीन महिने पुरणार आहे.

त्यामुळे आता रुग्णांच्या उपचारासाठी काेणतीही बाधा येणार नाही.

अँटिबायोटिकचे इंजेक्शन किंवा औषध हे शंभर मिलीलिटर सलाइनमध्ये व्यवस्थित मिसळते, त्यामुळे पेशंटला देण्यासाठी बहुतांश वेळा या सलाइनचा वापर करण्यात येतो, तसेच रुग्णांच्या शरीरातील सोडिअम कमी झाल्यावरही याचा वापर केला जातो. त्यासाठी माेठ्या ५०० मिली सलाइनची आवशकता नसते, म्हणून या १०० मिली सलाइनचा वापर वाढला आहे, परंतु ससून रुग्णालयामध्ये शंभर मिलीलीटर सलाइनचा तुटवडा झाला हाेता. पुढील तीन आठवड्यांपुरताच साठा शिल्लक हाेता.

याबाबत दैनिक 'लाेकमत'मध्ये 'नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती नाही ना!' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याबाबत शासनाचे लक्ष वेधले हाेते. औषधांची हाफकिनकडून बंद झालेली औषध खरेदी व नवीन औषध खरेदी प्राधिकरणाचे कामकाज सुरू न झाल्याने वैद्यकीय रुग्णालयांमधील औषध खरेदी रखडली आहे.

राज्य सरकारने हाफकिन संस्थेकडून औषधांची होणारी खरेदी बंद केली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी करावी लागते. नांदेड प्रकरणात एकूण निधीपैकी ३० ते ४० टक्के निधीतून स्थानिक पातळीवर खरेदी करता येते.

शासनाच्या नियमानुसार व त्यांनी दिलेल्या दरांनुसार, स्थानिक पातळीवर ससून रुग्णालयाने १०० मिलीच्या ३८ हजार सलाइनच्या बाटल्यांची खरेदी केली आहे. त्या सलाइन पुढील ३ महिन्यांसाठी पुरणार आहेत. काेणत्याही औषधांचा आता तुटवडा नाही.

Post a Comment

0 Comments