Type Here to Get Search Results !

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आमदारच सुरक्षित नसल्याचे उघड ; आमदार रोहित पवार यांच्या हडपसर कार्यालयातच जाळपोळ ? हडपसर पोलिसांचा हलगर्जीपणा...

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आमदारच सुरक्षित नसल्याचे उघड ; आमदार रोहित पवार यांच्या हडपसर कार्यालयातच जाळपोळ ? हडपसर पोलिसांचा हलगर्जीपणे...

पुणे :- पुण्यातील पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणारे परिमंडळ ५ मध्ये असलेले हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्याचे सरळ सरळ उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे असलेले जनसंपर्क कार्यालयात तोडफोड आणि जाळपोळ करून तसेच ऑईलपेंट टाकून आवारातील स्पोर्ट्स सायकल जाळणारे आरोपी मोक्काटच असून, हडपसर पोलिसांना या अज्ञातांचा शोध लागलेलाच नाही. पोलिसांचा हलगर्जीपणाच याला नडला असून, तोडफोड व जाळपोळ झालीच नसल्याचा दावा प्रथम हडपसर पोलिसांकडून करण्यात आला होता. परंतु, जोर वाढल्यानंतर गुन्हे शाखेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर गांभीर्य दाखवत त्या अज्ञातांचा शोध सुरू केला आहे. परंतु, अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. पाच दिवसांपुर्वी १६ तारखेला (रविवारी) पहाटे हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी सुनील महादेव पाटील (वय २९, रा. पुरंदर कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांचे हडपसर येथील भोसले गार्डनजवळील चिनार हॉटेल सृजन हाऊस येथे जनसंपर्क कार्यालय आहे. येथे सुनील पाटील हे देखरेखीसाठी असतात. दरम्यान, पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन व्यक्तींनी ही तोडफोड व ऑईलपेंट टाकून सायकल जाळली. दोघांनी भिंतीवरून इमारतीच्या भागात प्रवेश करून हा प्रकार केला. तक्रारदारांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.
हडपसर पोलिसांनी येथे धाव घेतली. पण, प्रकरण उगाच हलक्यात घेतलं अन् सुरक्षा रक्षकाचाच वाद असेल, केवळ सायकल जाळली म्हणत ते गांभीर्याने घेतले नाही. तोपर्यंत कारमधून आलेले अज्ञात व्यक्ती फरार झाले. पण, माध्यमांनी स्वत: जाऊन पाहणी करत जाळपोळ, तोडफोड व ऑईलपेंट टाकल्याचे समोर आणल्यानंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य उमगले आणि वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शाखेने या घटनेत लक्ष घातले.

गुन्हे शाखेकडून आता या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला आहे. आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. पण, त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. पाच दिवसानंतरही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले आहे.

मागे काही पत्रकारांनी आणि नागरिकांनी देखील परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांना हडपसर पोलीस ठाण्याबाबत लक्ष देण्याबाबत कळविले होते, परंतु त्यांनी त्यावर लक्ष दिले नसल्याचे समजले होते.

यात आता नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे की, जर आमदारांचे घरे आणि कार्यालय सुरक्षित नसतील तर, सामान्यांच्या घराचं कसं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त यामध्ये काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments