टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- पश्चिम बंगाल निवडणुकांबाबत राजकारण सध्या तापले आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंगाल दौर्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा बंगालमध्ये दाखल झाले, यावेळी त्यांनी आपल्या भाषणामधून ममता बॅनर्जी यांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याबाबत भाष्य केले. महत्वाचे म्हणजे शाह यांनी यावेळी सीएएचा (CAA) उल्लेख केला. ते म्हणाले कोविड लसीकरणाची (COVID Vaccination) प्रक्रिया संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मतुआ समुदायासह सीएए अंतर्गत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
यासह, नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत अल्पसंख्याकांची दिशाभूल केल्याचा विरोधी पक्षांवर आरोप करीत ते म्हणाले की, सीएएच्या अंमलबजावणीचा भारतीय अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वावर परिणाम होणार नाही.
ठाकुरानगर या मतुआबहुल भागातील मोर्चात अमित शहा म्हणाले, 'आम्ही सीएए लागू करणार होतो मात्र त्याचवेळी कोरोनाचे संकट उभे राहिले. आता लसीकरण करण्याचे काम संपताच, कोरोनातून मुक्त होताच भाजपा सरकार आपणा सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.
दरम्यान, मतुआ समाज हा मूळचा पूर्व पाकिस्तानचा असून, विभाजन आणि बांगलादेश निर्मितीनंतर ते हिंदुस्थानात स्थलांतरित झालेल्या दुर्बल घटकातील हिंदू लोक आहेत. त्यापैकी बर्याच जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे पण अजूनही काही लोकांना ते मिळाले नाही. यावर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याने, सीएएच्या अंमलबजावणीला विरोध करण्याच्या स्थितीत त्या नसतील असेही शाह म्हणाले.
Post a Comment
0 Comments