पुढे ते म्हणाले की, “फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. जरुर चार पाचशेंनी वाढते, परत दोन तीनशेंनी कमी होते. त्यामुळे दररोज अडीच तीन हजाराने रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून आहे. पण करोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाढला आहे, नाही असं नाही. आज फक्त ३६०० आहेत, कालच्या तुलनेत कमी झालेत. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नाही. पण काळजी जरुर घेतली पाहिजे”.
“जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे करोना रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच,” यावर राजेश टोपे यांनी जोर दिला.
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
– कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत.
– सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.
– मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा.
– ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या.
– जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.
– गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे.
– विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात.
– उपहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही.
– स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे.
– ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे.
– लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.
– हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा.
– सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी.
– गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा.
ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा.
Post a Comment
0 Comments