पुणे : भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील', असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत.
शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात, गोपीचंद पडळकर यांनी केला.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील यांनी पडळकरांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले आमदार तुपे?
पडळकर ज्या विचारधारेला मानतात तीच मुळात विकृती आहे. ती विकृती म्हणजेच एका प्रकारची बिमारीच असते. हे पडळकर आजारी आहेत आणि आम्हाला शिकवलंय "रोग्याशी नाही रोगाशी लढायचंय" आणि हा रोग आहे त्यातले हे रुग्ण आहेत. त्यामुळे असे अनेक मानसिक विकृत रोगी हे महाराष्ट्रातच नाही तर देशात सुद्धा भेटतात.
असे आमदार तुपे म्हणाले आहेत.
Post a Comment
0 Comments