Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या आमदाराने केली शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचाराची पोलखोल...




राष्ट्रवादीच्या आमदाराने केली शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचाराची पोलखोल...


नगर :- सरकारने अल्प दरात गरजुंसाठी शिवभोजन योजना आणली. लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरजु उपाशीपोटी राहू नये, यासाठी पुरवठा विभागातर्फे धान्यवितरण सुरू केले. मात्र शिवभोजन योजनेत केवळ २५ लोकांना जेवण देऊन शिवपंगत संपल्याचा डांगोरा केंद्रचालक पिटतात. 


उर्वरित गरजुंच्या नावाखाली डुप्लिकेट फोटो अपलोड करतात. त्यामुळे बहुतांश गरजु अन्नापासून वंचित राहत आहेत. तसेच धान्य वितरणासाठी दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा आदेश दिलेला असताना, फक्त दोन तास दुकाने सुरू ठेवून लोकांना नादी लावण्याचा प्रकार सुरू आहे.


अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून, या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी वरिष्ठ पातळीवर करणार आहोत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 


जगताप म्हणाले शिवभोजन योजनेतुन जास्तीत जास्त गरजुंना अन्न मिळावे, यासाठी शिवथाळ्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत शिवभोजन योजना सुरू केली. उर्वरित तालुक्‍यांतही कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काही केंद्रचालक गैरफायदा घेऊन, गरजुंना उपाशी मारून आपली पोळी भाजण्याचा धंदा करीत आहेत.


काही केंद्रांना १५० ते २५० थाळ्यांसाठी परवानगी असताना, केवळ २५ गरजुंना अन्न दिल्यावर उर्वरित थाळ्यांचे डुप्लिकेट फोटो अपलोड करून त्याचा पैसा लुबाडत आहेत.


स्वस्त धान्य दुकानांतुन होणाऱ्या धान्यवितरणातही मोठा गफला सुरू असल्याचे जगताप म्हणाले, दुकानदारांना आठ तास दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश असताना, दोन तासांत ती बंद केली जातात. गरजुंना धान्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्याला पुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांची साथ आहे.


जिल्ह्यातील या कारभाराविषयी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना सर्व माहिती दिली आहे. त्यांनी सचिवांना चौकशीच्या सुचना देण्यास सांगितले आहे. तसेच आपणही वरिष्ठ पातळीवर पुराव्यानिशी तक्रार करणार आहोत, असे जगताप म्हणाले.


Post a Comment

0 Comments