नवीदिल्ली:ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू करण्यात आला होता.
या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला-त्यातील २४ भारतीय पर्यटक, एक नेपाळचा पर्यटक आणि स्थानिक घोडेवाला होता. दहशतवाद्यांनी धार्मिक ओळख पटवून थंड डोक्याने गोळ्या घातल्या. घोडेवाला एका पर्यटकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना मारला गेला.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या एका गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तपासात पाच दहशतवाद्यांच्या गटात तीन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर देशभरात संताप उसळला आणि भारत सरकारने सिंधू जल कराराचा निलंबन, पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसांचा रद्दबातल, तसेच अटारी सीमेचे बंदीकरण यासारख्या अनेक राजनैतिक उपाययोजना केल्या.
७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले. लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांचा नाश करण्यात आला आणि सुमारे १०० दहशतवादी ठार झाले. यात २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील आणि १९९९ च्या IC-814 विमान अपहरण प्रकरणातील आरोपीही होते.
लष्कर आणि जैशचे पाच मुख्य operative ठार झाले-मुदस्सर खडीयान खास, खालिद उर्फ अबू अकाशा (लष्कर-ए-तोयबा), मोहम्मद युसुफ अझहर, हाफिज मोहम्मद जलील, आणि मोहम्मद हसन खान (जैश-ए-मोहम्मद). मोहम्मद युसुफ अझहर हा जैशचा संस्थापक मसूद अझहरचा मेव्हणा आणि IC-814 अपहरण प्रकरणातील आरोपी होता.
पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाब सीमांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची लाट सुरू केली. सीमारेषेवर शेलिंग सुरूच राहिले. भारतानेही पाकिस्तानच्या लष्करी तळांवर, रडार साईट्स आणि दारुगोळा गोदामांवर अचूक हल्ले केले. हे सर्व ऑपरेशन सिंदूरच्या विस्ताराचा भाग होते.
शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधी मान्य केल्याची घोषणा केली. काही मिनिटांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शस्त्रसंधीची पुष्टी केली. भारताने मात्र कोणतीही अमेरिकी भूमिका मान्य केली नाही आणि ही शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर झाल्याचे सांगितले.
भारताने स्पष्ट केले आहे की, भविष्यात पाकिस्तानकडून कोणतीही दहशतवादी कारवाई झाली, तर ती युद्ध समजली जाईल आणि भारत त्याला तितक्याच कडकपणे प्रत्युत्तर देईल
Post a Comment
0 Comments