ही टोळी HR प्रोफेशनल्स असल्याचे भासवून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत होती. Shine.com आणि Naukri.com सारख्या प्लॅटफॉर्मवर आपले प्रोफाइल अपलोड केलेल्या उमेदवारांना ही टोळी लक्ष्य करत होती. पोलिसांच्या मते, हा अत्यंत ‘सुसंगठित आणि स्तरित’ प्रकारचा फसवणूक प्रकार होता. आरोपींनी नोकरीच्या नावाखाली प्रशिक्षण शुल्क, सुरक्षा ठेव, जॉब किट चार्जेस अशा विविध कारणांसाठी पैसे उकळले.
ही बाब समोर आली, जेव्हा एका महिलेनं तक्रार दाखल केली की, तिची ३०,००० रुपयांहून अधिक रक्कम फसवणूक करून घेतली गेली. तिने Shine.com आणि Naukri.com वर आपला प्रोफाइल अपलोड केला होता आणि वैद्यकीय नोकरीच्या शोधात होती. काही दिवसांतच तिला विविध नंबरवरून कॉल आले आणि सुरुवातीला ५०० रुपये ‘रिफंडेबल’ ठेव मागितली गेली, त्यानंतर प्रशिक्षण व कागदपत्रांसाठी मोठ्या रक्कमांची मागणी केली गेली. शेवटी ११,००० रुपयांच्या ‘सॅलरी अकाउंट ओपनिंग’साठी पैसे मागितल्यावर तिला संशय आला आणि तिने पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि Shine.com च्या मदतीने संशयितांचा माग काढला. १४ मे रोजी नोएडा सेक्टर ३ येथील एका कार्यालयावर छापा टाकून पोलिसांनी ८ लॅपटॉप, ४७ मोबाईल फोन, ५७ सिमकार्ड, १५ डेबिट कार्ड, २ वायफाय डोंगल आणि १.३१ लाख रुपये रोख जप्त केले.
आरोपी Shine.com च्या रिक्रुटर सेवेला सबस्क्राइब करून नोकरी शोधणाऱ्यांची माहिती मिळवत आणि HR एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून कॉल व ईमेलद्वारे फसवणूक करत होते. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी बळी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी नोकरी शोधणाऱ्यांना इशारा दिला आहे: कोणतीही खरी कंपनी नोकरीसाठी पैसे मागत नाही. प्रशिक्षण, कागदपत्रे किंवा सॅलरी अकाउंटसाठी पैसे मागितले जात असतील, तर तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो.
Post a Comment
0 Comments