मुंबई: मुंबईतील कस्टम अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी उघडकीस आणली असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांत चार जणांना अटक करण्यात आली आहे. यात CISF अधिकारी आणि एक इराणी महिला व्यावसायिक यांचा समावेश आहे. या कारवाईत एकूण ४.५ कोटी रुपयांचे सोनं जप्त करण्यात आलं आहे.
८ मे रोजी, एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) मुंबई विमानतळाबाहेरील पार्किंगमध्ये संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अन्सारी हसन या व्यक्तीला ताब्यात घेतलं. तपासणी दरम्यान त्याच्याकडे टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले ६३० ग्रॅम सोनं सापडलं, ज्याची किंमत ५७ लाख रुपये आहे. चौकशीत हसनने हे सोनं CISF अधिकारी अखिल धालेकडून मिळाल्याचे कबूल केले. धालेने हे सोनं आपल्या मोज्यांमध्ये लपवून विमानतळाबाहेर आणल्याचे आणि यापूर्वीही असे केल्याचे मान्य केले.
दुसऱ्या घटनेत, दुबईहून आलेली इराणी नागरिक मेलिका रझिनी (२८) ही ग्रीन चॅनेलमधून कोणतीही वस्तू जाहीर न करता बाहेर पडली. संशयावरून तिला थांबवून तपासणी केली असता, तिच्या कमरेला बांधलेल्या पारदर्शक पिशवीत ३.६ किलो २४ कॅरेट सोनं सापडलं, ज्याची किंमत ३.३ कोटी रुपये आहे. रझिनी ही मूळची शू मॅन्युफॅक्चरर असून, तिने दुबईतून हे सोनं खरेदी करून भारतात विकण्यासाठी आणल्याचे सांगितले.
या अटकेमुळे आणि सोन्याच्या जप्तीमुळे मोठ्या तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत आणि इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
Post a Comment
0 Comments