Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Arvind Kejriwal : विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही.; निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य

 


नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही.

तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भाजपाने या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत या निवडणूक निकालावर भाष्य केले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे, ते सर्व ते (भाजपा) पूर्ण करतील. परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची सेवा करत राहू, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांवर आपला विश्वास असल्याचे म्हणत विजय आपलाच असणार, असे निवडणूक निकालाआधी म्हटले होते. पण आज (8 फेब्रुवारी) हाती आलेल्या निकालानुसार, दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा आपच्या हाती सत्ता देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे 27 वर्षांनंतर भाजपाला विजयी केले आहे. भाजपाने 36 हा बहुमताचा आकडा पार करत दिल्लीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. महत्त्वाचे म्हणजे आपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेतून निवडणूक लढवली होती. तर याच मतदारसंघातून भाजपाने परवेश वर्मा यांना तर काँग्रेसने संदीप दिक्षीत यांना उमेदवारी दिली होती. परंतु, भाजपाचे परवेश वर्मा हे या निवडणुकीत जायंट किलर ठरले असून त्यांनीच केजरीवालांवर झाडू फिरवला आहे.

Post a Comment

0 Comments