Congress : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळावलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठी निराशा पदरी पडली.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ठाकरे गटाने स्वबळाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी याबाबत भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, ही आघाडी कितपत टिकेल, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली आहे. यातच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत अनेक नावे स्पर्धेत आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडीचा आग्रह धरणार, याबाबत सतेज पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
महायुतीचा पराभव होणे गरजेचे
जिथे शक्य असेल तिथे म्हणजे एखाद्या जिल्ह्यात आघाडी करणे शक्य असेल तर आघाडी केली पाहिजे. कारण महायुतीचा पराभव होणे गरजेचे आहे. महायुतीच्या पराभवासाठी आम्ही काँग्रेस म्हणून जी पावले उचलली पाहिजे ती उचलली जातील. मग जिथे शक्य होईल तिथे आम्ही एकत्रितपणे लढायला उतरणार आहोत. मात्र, पक्ष म्हणून आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका ताकदीने लढणार आहोत, असे सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान, आता आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत आम्ही ताकदीने कसे लढता येईल? हे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही आघाडी करणार आहोत, तसेच ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस म्हणून ताकदीने निवडणुका लढवू. कारण आमची लढाई ही महायुतीशी आहे. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत एकत्रित लढणे अपेक्षित आहे. तसेच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे किंवा नाही? यावर मी बोलणे संयुक्तिक ठरणार नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले. ते साम टीव्हीशी बोलत होते.
Post a Comment
0 Comments