पुणे : - शनिवार रात्री दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाची फ्लाईट होती. परंतू, कंपनीने सात तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवले होते. यानंतर तांत्रिक बिघाड म्हणून सांगत पहाटे दोन तासांसाठी खाली उतरवून बसमध्ये फिरवून पुन्हा विमानतळावर नेले व त्याच विमानात बसवून रविवारी सकाळी पुण्याला पाठवून दिल्याचे समोर आले आहे.
हा सर्व प्रकार दाट धुक्यामुळे झाल्याचे समजते आहे. एवढा वेळ विमानात बसवून ठेवल्याने वयस्कर प्रवाशांसह अनेकांना मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
दिल्ली-पुणे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाईटमध्ये २०० प्रवासी होते. दोन तासांत ते पुण्यातही उतरणार होते. परंतू विमानाने उड्डाणचे केले नाही. तास दोन तास गेल्यानंतर प्रवाशांनी क्रू मेंबरना विचारणा केली तर तेव्हा त्यांना धुक्यामुळे विमान उडाले नसल्याचे व लवकरच उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवासी शांत राहिले परंतू पुन्हा तासभर उलटल्यावर प्रवाशांना आता आपण काही पुण्याला जाण्यासाठी निघत नसतो याची जाणीव झाली होती.
विमानात बसवून ठेवण्याऐवजी आम्हाला विमानतळावर न्या अशी प्रवाशांनी मागणी केली होती. परंतू कंपनीने यावर काहीही हालचाल केली नाही. यामुळे सुमारे सात तास प्रवासी विमानातच अवघडलेल्या स्थितीत बसून होते. अखेर पहाटे साडे पाच वाजता प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. त्यांना बसमध्ये बसवून पुन्हा विमानतळावरच घिरट्या घातल्या गेल्या. यानंतर काही काळाने त्यांना नवीन टर्मिनलवर पाठविण्यात आले व तिथे सुरक्षा तपासणी करण्यास सांगण्यात आले.
विमानतळावर आधीच अनेक विमाने लेट झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यात या प्रवाशांची अबाळ झाली. यात या प्रवाशांचे दोन तास गेले, यानंतर सकाळ उजाडताच या प्रवाशांना त्याच विमानात बसवून पुण्याला पाठवून देण्यात आले. अशा प्रकारे या प्रवाशांचा दिल्ली-पुणे प्रवास सुमारे १२ तासांचा झाला. रात्री ९.४० मिनिटांनी निघणारे हे विमान सकाळी १० वाजता पुणे विमानतळावर पोहोचले आहे.
Post a Comment
0 Comments