नांदेड - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत इतर पक्षांमध्ये लढत आहे. मात्र महाविकास आघाडीत काही जागांवर मविआचे २ उमेदवार रिंगणात असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी काही कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्याविरोधात उद्धवसेनेकडून कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र ऐनवेळी ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्यानंतर निष्ठावंतांनी मातोश्री गाठून तिथे आग्रह धरला तेव्हा ही जागा पक्षाकडेच ठेवण्यात आली. त्यातही निष्ठावंतांपैकी एकाला संधी द्यावी अशी मागणी मातोश्रीकडे होत होती. परंतु उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता डक यांना ठाकरे गटाने एबी फॉर्म दिला. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाली.
उद्धव सेनेतच पडले २ गट
संगीता डक यांच्या उमेदवारीमुळे माधव पावडे आणि बंडू खेडेकर हे दोन्ही जिल्हाध्यक्ष नाराज झाले. त्यामुळे दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या लोहा, नांदेड दौऱ्याकडेही पाठ फिरवली होती. तर काही जणांनी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचाराला सुरूवात केली. पक्षाकडून या निष्ठावंतांची समजूत घालण्याचाही आटोकाट प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यानंतरही नाराजी दूर झाली नाही तर दुसरीकडे हे निष्ठावंत इतर मतदारसंघात मात्र मविआ उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर मतदारसंघात उद्धव सेनेत दोन गट पडल्याचे चित्र आहे तर काहींनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
शरद पवारांचा पाठिंबा काँग्रेसला
काही दिवसांपूर्वी वसमतच्या जाहीरसभेत शरद पवारांनी ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर पत्रकारांनी नांदेड उत्तरमध्ये महाविकास आघाडीचे २ उमेदवार आहेत. नेमकं मविआचा उमेदवार कोण असा प्रश्न शरद पवारांना केला. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिले की, मी उमेदवारांची नावे काय हे विचारले होते, माझ्याकडे काहींनी लिखित नावे दिली. ती नावे मी वाचून दाखवली. त्यानंतर माझ्या लक्षात आले की नांदेड उत्तरला आम्हा सर्वांचे उमेदवार अब्दुल सत्तार आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची निशाणी पंजा आहे. आमचे समर्थन, पाठिंबा अब्दुल सत्तार यांच्यासाठीच आहे, अन्य कुणाला नाही अशी सुधारणा शरद पवारांनी केली होती.
Post a Comment
0 Comments