Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका

 

देवगड : गद्दारी करून चिन्ह, पक्ष, नाव चोरलात, हे करून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलात? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केलात, अशी बोचरी टीका देवगड येथील जाहीर प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड सारस्वत बँकेसमोरील पटांगणात आयोजित प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, उद्धवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी वडील उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसतानाही, त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. अशा परिस्थितीत गद्दारी करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचे काम केले. आज मुंबईचे अस्तित्व कोकणी माणसामुळे टिकून आहे. बाळासाहेबांपासून कोकण आणि शिवसेना असे अतूट नाते आहे. परिवर्तन आवश्यक आहे. परिवर्तनासाठी तुम्हाला मशाल पेटवावी लागेल, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
यावेळी स्वप्निल धुरी, किरण टेंबुलकर, विवेक ताम्हणकर, ॲड.प्रसाद करंदीकर यांनी विचार मांडले. सभेपूर्वी जामसंडे ते देवगड अशी बाइक रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले. या सभेनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आचरा, कुडाळ तालुक्यातील माणगाव आणि वेंगुर्ला येथेही प्रचार सभा झाल्या.

Post a Comment

0 Comments