मुंबई : अमरावती शहरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
विधान परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून काँग्रेस पक्षाने सुलभा खोडके यांची हकालपट्टी केली. सुलभा खोडके यांनी पक्षासमोर खुलासा करूनही पक्षाने त्यांचे ऐकले नाही. सरतेशेवटी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी सुलभा खोडके यांना विधानसभा निवडणुकीकरीता एबी फॉर्मही दिला.
सुलभा खोडके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. आता विद्यमान आमदार म्हणून त्या अमरावती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार म्हणून आपल्याला सन्मान देण्यात आला नाही, अशी खंत व्यक्त करीत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाल्याने अजित पवार यांनी अमरावतीतील जनसन्मान यात्रा रद्द केल्याने सुलभा खोडके यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. अखेर बुधवारी 23/10/2024 त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले.
Post a Comment
0 Comments