समीर भुजबळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी विद्यमान आमदार सुहास कांदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
समीर भुजबळ नांदगाव मनमाड विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. छगन भुजबळ यांनी एक ट्विट करत तसे संकेत दिले होते. अखेर त्यावर समीर भुजबळ यांनी शिक्कामोर्तब केले.
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा
सुहास कांदे हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गेली. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी प्रयत्न केले. पण, उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
समीर भुजबळ नांदगाव विधानसभा निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करतानाच समीर भुजबळ यांनी नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
"मी आज अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो. त्यांनी मला मुंबईत काम करण्याची संधी दिली. मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा तिन्ही नेत्यांना पाठवला आहे", असे समीर भुजबळ म्हणाले.
"येणाऱ्या २८ ऑक्टोबर रोजी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. भयमुक्त नांदगाव हे मिशन हाती घेऊन अर्ज भरणार आहे", असे म्हणत समीर भुजबळ यांनी सुहास कांदेंविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
Post a Comment
0 Comments