पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर मध्ये छापून आलेल्या एका लेखामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 'मोदी ३.० : कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन' या मथळ्याखाली छापून आलेल्या या लेखात अजित पवार यांना सोबत घेतल्याने भारतीय जनता पक्षाचं नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
यावर आता खुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आज पुण्यात झालेल्या बैठकांनंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, की मला त्याबद्दल काही बोलायचे नाही. लोकसभा निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांची लोक आपली मत व्यक्त करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर मला कोणतीगी टीका टिपण्णी करायची नाही. मी विकासात लक्ष घालत आहे, महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील याकडे लक्ष दिलं आहे. नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
'ऑर्गनायझर'मधील लेखात काय आहे?
'महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली', असं या लेखात म्हटलं आहे.
आषाढी वारीच्या तयारीची बैठक
दरम्यान, पुण्यातील बैठकीत आषाढी पायी वारीबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. पुणे, सोलापूर, सातारा येथून दोन्ही संत यांची पालखी जाते. पालखीचा विसावा अनेक ठिकाणी असतो. तिथली व्यवस्था, वारकरी, दिंडीप्रमुख अनेक लोकं जातात. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे तिथे व्यवस्था पाहावी लागणार आहे. १५ लाख लोकं पंढरपूरमध्ये जमतील. विभागीय आयुक्त या क्षेत्रातील अनेक लोकांसोबत आज बैठक घेण्यात आली. विविध सूचना देण्यात आल्या आहेत. काही सूचना आम्ही स्वीकारल्या आहेत. काही निधी राहिला होता, त्याचा जी आर सुद्धा पोहचला आहे. सुरक्षा, स्वच्छता या संदर्भात काळजी राज्य सरकारने घेतली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
Post a Comment
0 Comments