Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित...


'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित...

पुणे :- आज भारतात 'मंजुमल बॉईज' आणि 'अवेशम'सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील 'पंचायत', 'फॅमिली मॅन'सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा 'विषय हार्ड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज याची निर्मिती असलेल्या 'विषय हार्ड'चे निर्माते गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथालेखनही केलं आहे. 'चल... चल... चल... पळ... पळ... पळ..., कोण पळतंय पुढे?' असं म्हणत 'विषय हार्ड'चं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्रामीण-निमशहरी भागातील एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं पोस्टरवर दिसतात. त्या सर्वांच्या पुढे एक बाईक आहे. त्यावर एक तरुण आणि तरुणी आहेत. 'पुढे रस्ता बंद आहे', असं लिहिलेला फलक दिसतो आणि 'विषय हार्ड' हे शीर्षक येतं. येत्या जुलै महिन्यात डायरेक्ट थेटरमध्ये असं रांगड्या कोल्हापूरी भाषेत लिहिलं वाक्य 'विषय हार्ड'च्या प्रदर्शनाची घोषणाही करतं. सर्वांच्या पुढे पळणाऱ्या बाईकवर बसले आहेत मुख्य भूमिकेतील पर्ण पेठे आणि सुमित... या चित्रपटाच्या निमित्ताने पर्ण आणि सुमित प्रथमच एकत्र आले असल्याने प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्ण-सुमितच्या जोडीला हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. 

दिग्दर्शक सुमित यांनी दिपक भिकाजी माडकेर यांच्या साथीने चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केलं आहे. नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित पाटील, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं असून, ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वेशभूषा सायली घोरपडे यांची, तर संकलन सौरभ प्रभुदेसाई यांचं आहे. डिओपी अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संदीप गावडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. जुलैमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments