विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड...
पुणे : पुण्यात अल्पवयीन धनिकपुत्रानं दोन इंजिनिअर्सना आपल्या बापाच्या महागड्या कारनं चिरडलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई आणि धनिकपुत्राला मिळालेला जामीन यामुळे हे प्रकरण देशभरात भलतंच चर्चेत आहे.
अल्पवयीन धनिकपुत्राची रवानगी सध्या कोर्टानं बालसुधारगृहात केली आहे. तर ज्या गाडीनं भीषण अपघात झाला, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सध्या महागड्या पोर्शे गाडीची तपासणी सुरू आहे. मुंबईहून एक पथक पुण्याला जाऊन या गाडीची तपासणी करत असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. स्पोर्ट्स कार असलेल्या पोर्शे गाडीत असलेल्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या काही क्लिप्सच्या मदतीनं अपघात नेमका कसा झाला? हे स्पष्ट होणार आहे. मुंबईहून आलेल्या पोर्शे कंपनीच्या एका पथकानं आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीनं सोमवारी गाडीची संपूर्ण पाहाणी केली. सर्व तपशील तपासून पाहिला. तसेच, गाडीतील इलेक्ट्रॉनिक डेटासह डॅश कॅम आणि गाडीच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेऱ्यातील क्लिप्स ताब्यात घेतल्या आहेत.
ड्रायवरला डांबून नेलेली 'ती' गाडी पोलिसांकडून जप्त
अपघातावेळी लाडोबासोबत असणाऱ्या ड्रायव्हरला ज्या गाडीतून जबरदस्तीनं बसवून नेलं गेलं, ती घाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणी धनिकपुत्राच्या आजोबांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मला गाडीत जबरदस्तीनं बसवून घेऊन गेले, असा आरोप गंगाराम यानं केला आहे. ड्रायव्हरनं सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल याच्या विरोधात या गाडीतून नेल्याचं आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून या गाडीचाही कसून तपास पुणे पोलीस करणार असल्याचं समोर आलं आहे.
Post a Comment
0 Comments