पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली शरद पवारांचा विधान...
पुणे : शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जी जबाबदारी आहे ती पाळली, त्यामुळे उगीच याला वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही असं सांगत शरद पवारांनी पुणे अपघात प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना फटकारलं आहे.
पोर्शे अपघातात २ जणांचा मृत्यू झाला त्यानंतर या घटनेतील अल्पवयीन आरोपीला किरकोळ अटींवर जामीन देण्यात आला. त्यामुळे सोशल मिडियासह विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तातडीने या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालय गाठत प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या. या काळात आरोपीच्या वकिलांचे शरद पवारांशी संबंध असल्याचा फोटो व्हायरल झाला त्यावर पवारांनी उत्तर दिले.
शरद पवार म्हणाले की, एखाद्या पेपरनं वकिलासोबत माझा फोटो छापला म्हणून माझा अपघाताशी संबंध कसा काय जोडता? प्रत्येक गोष्टीवर मी भाष्य करणं गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी असते ती पार पाडलेली दिसते त्यामुळे उगीच याला वेगळं स्वरुप देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. एकंदरीत शरद पवारांच्या या विधानामुळे पुणे अपघातावर राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाच फटकारल्याचं दिसून येते.
देवेद्र फडणवीसांचा पुढाकार, तपास यंत्रणाने वेगाने चक्र फिरवली
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण चर्चेत येताच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे गाठले. त्याठिकाणी अपघाताबाबत माहिती घेत तात्काळ पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात वेगाने चक्र फिरवत आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. या अपघाताच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी पुढाकार घेत पुणे पोलिसांना जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अपघात प्रकरणी आतापर्यंत आरोपीचे आजोबा आणि वडिलांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. हे ५ लोक दोन पबचे मालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत. अल्पवयीन आरोपींना दारू पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Post a Comment
0 Comments