तेजसच्या MYST परफॉर्मिंग आर्ट्सचा जगभर प्रवास
पुणे : लोकांमध्ये "नृत्य कलेबद्दल" जागरुकता वाढविण्यासाठी, नृत्याच्या अनेक प्रकारांबद्दल आणि त्यांच्या कलेतील मूल्यांबद्दल शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने आंतराराष्ट्रीय नृत्य दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. पुण्यातील तेजस गर्भेचा आंतराराष्ट्रीय स्तरावर चांगलाच डंका वाजत आहे. नुकत्याच झालेल्या ऑरलँडो मधील जागतिक साल्सा शिखर परिषदेत तेजसने रायझिंग स्टार आणि प्रोफेशनल या दोन्ही प्रकारांमध्ये सर्वोच्च सन्मान पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये इटली, फ्रांस, ऑस्ट्रेलियासह जगभरातील डान्सर सहभागी झाले होते. पारंपारीक नृत्यशैली ते बॅलेट ते समकालीन, जॅझ ते लॅटिन, बॉलरूम ते बॉलीवूड आणि हिप हॉप अशा विविध प्रकारच्या नृत्यशैली तेजसने जगभर सादर केल्या आहेत. तेजस गर्भेने केवळ त्यांच्या कलेचाच गौरव केला नाही तर आंतरराष्ट्रीय नृत्य क्षेत्रात एक उगवता तारा म्हणून उदयास आला.
तेजसचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले असून यू.के. मधील प्रतिष्ठित मास्टर्स परफॉर्मिंग आर्ट्स कॉलेजमधून परफॉर्मिंग आर्ट्स/संगीत थिएटरमध्ये त्याने पदव्युत्तर पदवी मिळवली. भारतात आल्यानंतर तेजसने MYST (मेक युवर सोल टॅप) परफॉर्मिंग आर्ट्सची निर्मिती केली. तेजसचा प्रवास भारतातील टेलिव्हिजन आणि रिॲलिटी शोमधील प्रेक्षकांना मोहित करण्यापासून ते सीमा आणि संस्कृती ओलांडून अनेक देशांमध्ये त्यांनी कला सादर केली आहे. लॅटव्हियन रशिया, ते ऑस्ट्रेलियातील अनेक नामांकित स्टुडिओ आणि प्रेक्षागृहांमध्ये त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले. ऑस्ट्रेलियात त्यांनी अपंग व्यक्तींनाही नृत्याचे धडे दिले आहेत. मिस्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्म-शोध आणि कलात्मक वाढीच्या प्रवासात तेजस चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतात.
तेजस म्हणाला की, जिद्द आणि १५ वर्षाची अविरत मेहनत केल्यानेच या स्पर्धेतील हे यश मिळाले आहे. नृत्य हे स्वतःला अभिव्यक्त करण्याचे शक्तिशाली साधन किंवा आनंद घेण्याचा एक मार्ग आहे. हे काही लोकांसाठी शारीरिक व्यायाम किंवा थेरपी म्हणून देखील काम करू शकते. नृत्य हा व्यायामाचा एक प्रकार आहे आणि तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी होण्यास मदत करतो. नृत्य कलेमुळे स्वतःलाबरोबर इतरांना देखील आनंद मिळतो. मला मिळालेले हे ज्ञान केवळ स्वतः पुरते न ठेवता इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी MYST (मेक युवर सोल टॅप) परफॉर्मिंग आर्ट्सची निर्मिती केली. यातून अनेक यशस्वी विद्यार्थी घडले.
Post a Comment
0 Comments