डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना...
पुणे : महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भीमराव बबन साठे (४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणावर सध्या राजकारण तापले आहे. याला विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याकाठी बुधवारी आंदोलन केले. हे आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचे उघड झाले. यानंतर आव्हाड यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
अशा प्रकारे वर्तन करून जितेंद्र आव्हाड यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलेले आहे. देशभरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. ही घटना सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे. मीसुद्धा ती प्रसारमाध्यमाद्वारे पाहिली असल्याचे साठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार आव्हाड यांच्यावर भा. दं. वि. कलम १५३, १५३ (अ), २९५ (अ), ५०४, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ भाजप व शिवसेनेच्या वतीने पुण्यात आंदाेलन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments