Type Here to Get Search Results !

मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन बसेस रवाना...

मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन बसेस रवाना...

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या ५१५ मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी १२९ बसेस आणि ५३ जीपची सुविधा उपलब्ध केली आहे. मतदानासाठीच्या साहित्याचे वितरण केल्यानंतर बसेस जीप मतदान केंद्रावर पोहचत आहेत.

अशी व्यवस्था सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात करण्यात आली आहे.

प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. लोकसभा निवडणुक मतदानाच्या अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही वडगाव बुद्रुक येथील स्प्रिंग डेल स्कूलच्या मैदानात होणार आहे.


कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली

निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती. साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी १०० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त केले आहे. साहित्य वाटपासाठी ५३ टेबलद्वारे कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटले आहे. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात दिले. याची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेतली.

मतदान केंद्रातील साहित्य

मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द केले आहे.

३ हजार १९१ अधिकारी- कर्मचारी नियुक्त

मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली आहे. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ३८ हजार ३१ मतदार आहेत. येथे ५१५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १९१ अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

साहित्य घेवून जाणाऱ्या प्रत्येक बसला पोलीस बंदोबस्त असून जीपीएस प्रणाली अद्यावत ठेवली आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी सुमारे १०० पथके राखीव ठेवली आहेत.

Post a Comment

0 Comments