विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून बीजेपी आक्रमक, पुतळा दहन करून केला निषेध...
काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल एक वक्तव्य केले होते.
माजी पोलीस महासंचालक एस एम मुश्रीफ यांच्या 'हेमंत करकरे यांना का व कुणी मारले?' या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी 'हेमंत करकरे यांचा खून कसाबने केला नसून आर आर एस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने केला असल्याचे सांगितले होते. तसेच, महायुतीचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करत, 'उज्ज्वल निकम हा बेईमान माणूस आहे. वकील नसून तो देशद्रोही आहे." असे वक्तव्य केले होते. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून भाजप कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात काल (रविवार, ५ मे) भाजपा युवा मोर्चा कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरमधील रामदास पेठ येथील निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी यावेळी बोलताना, "वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा वक्तव्य करू नये जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ," असे म्हणाल्या. तसेच, 'इतकी महत्त्वाची माहिती विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य का करतात?' असा सवाल ही भाजपा युवा मोर्चा कडून उपस्थित करण्यात आला.
Post a Comment
0 Comments