पुणे :- पुणे लोकसभा निवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा रोज सुरू आहेत. अशाच पदयात्रेदरम्यान एमआयएम पक्षाचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली. भव्य असे स्मारक उभारण्याचा त्यांनी आपला निश्चय बोलून दाखवला. टिपू सुलतान हे खरे स्वातंत्रवीर होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते इंग्रजांशी लढले आणि आपल्या प्राणाची आहुती दिली, पुण्यातील नागरिकांना खासकरून तरुणांनादेखील त्यांच्या शौर्याची गाथा कळली पाहिजे, या हेतूने हे स्मारक उभारले जाणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
कर्नाटकात टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच तापले होते. भाजपने या प्रकरणात टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याच्या निर्णयाला विरोध करत आक्रमक पवित्र घेतला. टिपू सुलतान यांनी हिंदूंची जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणली, हिंदूंवर अत्याचार केली, त्यामुळे त्याची जयंती साजरी केली जाऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. आता पुणे लोकसभेचे उमेदवार असलेल्या अनिस सुंडके यांनी पुण्यात टिपू सुलतानचे स्मारक उभारणार असल्याचे सांगून चर्चेला तोंड फोडले आहे.
यावेळी अनिस सुंडके म्हणाले 'आतापर्यंतच्या खासदारांनी आपल्या अल्पसंख्यांक तसेच वंचित समाजाला दुर्लक्षित केले. मुस्लीम समाजाचा वापर फक्त आपली वोटबँक म्हणून केला, परंतु आता आपल्याकडे एक संधी चालून आली आहे, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने आपल्याला दिली आहे, ती म्हणजे मतदानाचा हक्क, त्यामुळे या निवडणुकीत तुमच्याकडे एक संधी आहे, आपल्या समाजासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची.’ येत्या १३ तारखेला पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
पुण्यातील गुलटेकडी भागात सुंडके यांची प्रचार पदयात्रा होती,त्यामध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पदयात्रेला नागिरकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला,सुंडके यांना शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यात आले. यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फैय्याज शेख, शाहिद शेख व आदी पदाधिकारी व विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments