हदनाळ येथील नातीसह आजीचा पुण्यात अपघातात मृत्यू...
पुणे : नातीसह आजीचा पुणे येथील नवले ब्रिजजवळ ट्रकने ठोकरल्याने अपघाती मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२७) रात्री १० च्या सुमारास घडली. मंगल सिद्राम पाटील (वय ४०, रा.
म्हाकवे, ता.कागल) व परी सुरेश शेटके (वय ६, रा. हदनाळ, ता. निपाणी) अशी मृत आजी नातींची नावे आहेत. या घटनेची नोंद पुणे पोलिसांत झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, म्हाकवे येथील सिद्धराम तुकाराम पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या कुटुंबियांसह पुणे येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री त्यांच्या पत्नी मंगल पाटील व नात परी शेटके या दोघी रविवारी धार्मिक कार्यक्रम असल्याने आपल्या मूळगावी बसने येण्यासाठी नवले ब्रिजजवळ बसची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला थांबल्या होत्या.
दरम्यान, अचानक आलेल्या ट्रकने दोघींनाही जोराची धडक दिली. त्यामुळे दोघींही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रक चालकाला पकडून पोलिसांना कळवले. पुणे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, मंगल व परी यांचे मृतदेह म्हाकवे व हदनाळ येथे रविवारी दुपारी मूळगावी आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातामुळे म्हाकवे व हदनाळ गावावर शोककळा पसरली आहे. मृत परी हिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा तर मंगल यांच्या पक्षात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरा असा परिवार आहे.
परी ही हदनाळ येथे पहिली इयत्तेत शिकत होती. अत्यंत हुशार व मनमिळावू असलेली परी ही शाळेस सुट्टी असल्याने पंधरा दिवसांपूर्वी ती पुण्याला आजीकडे गेली होती. दरम्यान आजीसह ती गावाकडे परतत असताना काळाने दोघींनाही हिरावून नेल्याने दोन्ही गावावर शोककळा पसरली. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments