Type Here to Get Search Results !

बापदेव घाटामध्ये लूटमार करणाऱ्या ३ आरोपींना अटक...

बापदेव घाटामध्ये लूटमार करणाऱ्या ३ आरोपींना अटक...

पुणे : बोपदेव घाटात शस्त्राच्या धाकाने लूटमार करणार्‍या तिघा आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली. पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत त्यांच्याकडून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यामध्ये दोन दुचाकी, कोयते, सुरा, तीन मोबाईलचा समावेश आहे. साहिल अकबर बानेवाले (वय २१), गालिब बादशाह मेहबूब अत्तार (वय १९, रा. दोघे सिटी सेंटर रोड, उंड्री), राहुल परवाराम गौतम (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. २१ एप्रिल रोजी आशुतोष राज त्याचा मित्र आयान श्रीवास्तव, अनिकेत कुमार, आनंद राज यांच्यासह बोपदेव घाटातील टेबल पॉइंटवर रात्री अडीचच्या सुमारास गप्पा मारत बसला होता. त्यांना तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले.

ऑनलाइन पैसे घेऊन पळ काढला. कोंढवा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिस कर्मचारी शाहिद शेख आणि लक्ष्मण होळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बोपदेव घाटात लूटमार करणारे संशयित आरोपी परत लूटमार करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार दोन पथके तयार करून पोलिसांनी घाटात सापळा लावला. त्या वेळी दोन दुचाकीवरून आरोपी तेथे आले. त्यांनी गाडीत लपविलेली हत्यारे काढून पँटमध्ये खोचून ठेवली. त्यानंतर टेबल पॉइंटवर पाहणी करीत फिरू लागले. पोलिसांनी संशयित आरोपींना अचूक हेरले.

पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, कर्मचारी सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, नीलेश देसाई, गोरखनाथ चिकणे, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.




Post a Comment

0 Comments